गुरुवार, २० ऑगस्ट, २०१५

कळसूबाई - एक अविस्मरणीय अनुभव

कळसूबाई - एक अविस्मरणीय अनुभव 

“महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर कोणते ?” मराठी शाळेत कुठल्याशा इयत्तेत भूगोलाच्या पुस्तकात हमखास असणारा प्रश्न. वर्गातला अगदी ढ विद्यार्थीसुद्धा ह्याचं उत्तर बरोबर सांगे.... ‘कळसुबाई’. लहानपणापासूनच कळसुबाईबद्दल मनात आकर्षण आणि कुतूहल होतं. कधीतरी आपणही कळसुबाई सर करावं अशी एक सुप्त इच्छा मनात फार पूर्वीपासून होती.... अखेर काल ती पूर्ण झाली.
समुद्रसपाटीपासून ५४०० फूट म्हणजे सुमारे १६४६ मीटर उंची असलेलं हे शिखर नगर जिल्ह्यात आहे. गेल्या महिनाभरापासून आम्ही कळसुबाईसाठी नियोजन करत होतो पण कधी पावसाअभावी तर कधी इतर कारणांस्तव ते जमून येत नव्हतं. पण ह्यावेळी मात्र सगळ्या गोष्टी जमून आल्या आणि आमचं कळसुबाईला जायचं नक्की ठरलं. पुण्यातून आम्ही तिघे(मी, सारंग आणि नितीन) आणि चिपळूणहून ओंकार आणि सुमीत आले होते. मुंबईहून बबन परस्पर पायथ्याच्या गावी म्हणजे बारीला येणार होता. सुमीत आणि ओंकार रात्री  नऊ वाजता पुण्यात माझ्या घरी आले. पहाटे ३ ला निघायचं ठरलं होतं. नितीन आणि सारंगने गाडीची व्यवस्था केली होती. पहाटे ०३:३० ला आम्ही निघालो. सकाळी खूप जास्त अंतर चढाई करायची असल्याने गाडीत झोपायचं असं सगळ्यांनीच ठरवलं होतं पण कसलं काय.... गाडीत रात्रभर धिंगाणा सुरु होता... रात्रभर गाणी गात.. गप्पा मारत, मजा मस्ती करत आम्ही पहाटे ५.३० ला ओझरला पोचलो. तिथे गणपतीचं दर्शन घेऊन बारीच्या वाटेला लागलो... मध्येच एका निसर्गरम्य ठिकाणी सेल्फी स्टिक ने  फोटोसेशन करून पुढे निघालो... प्रत्येकजण अगदी उत्साही होता... सकाळी ९.१५ च्या सुमारास आम्ही पायथ्याच्या गावी बारीला पोचलो. समोर कळसुबाईचा रुद्रभीषण पहाड एखाद्या स्थितप्रज्ञ महापुरुषासारखा  दिसत होता... जणूकाही त्याचे भव्य हात पसरून आव्हानच देत होता... त्याचं आव्हान आम्ही स्वीकारलं होतं... इतर ऋतुंमध्ये मध्यम काठीण्यपातळी असलेला कळसुबाईचा पहाड पावसात मात्र चढताना थोडा त्रास देणार होता हे निश्चित होतं...
तिथेच एका घरगुती उपहारगृहात चहा पोह्यांचा कार्यक्रम झाला. तिथेच जेवणाची व्यवस्था करून आम्ही कळसुबाईची वाट धरली. पहाडाच्या माथ्यावर ढगांच्या दाटीमुळे त्याची नेमकी उंची कळत नव्हती पण साधारण अंदाज मात्र आला होता. आजूबाजूचा परिसर निसर्गरम्य होता.. तिथली ती डोळे निववणारी हिरवळ पाहून रात्रभर न झोपलेले आम्ही ताजेतवाने झालो आणि ०९.४५ ला चढाईला सुरुवात केली. पावसामुळे वाट निसरडी झाली होती त्यामुळे सुरुवातीला थोडं जपूनच चढत होतो...
१५-२० मिनिटं चढल्यानंतर एक समस्या अचानक उभी राहिली. ओंकारला चक्कर येत होती... त्याच्या डोळ्यांसमोर अंधारी येऊन तो एका दगडाचा आधार घेऊन खाली बसला... आम्ही सगळेच थोडे घाबरलो होतो कारण १० मिनिटं ओंकार काहीच नीट बोलतही नव्हता आणि डोळेही उघडत नव्हता. मी सोबत ग्लुकॉन डी ची पावडर आणली होती. ती पाण्यात मिसळून त्याला प्यायला दिली. सोबत बिस्कीट आणि चॉकलेटही दिले आणि त्याला थोडा आराम करायाला सांगितलं. अजून २% ही चढाई झाली नव्हती आणि त्यात असं काहीतरी घडल्यामुळे आम्ही सगळेच थोडे चिंतेत पडलो होतो. आम्ही ओंकारला धीर  दिला आणि त्याला तिथेच थोडं आडवं व्हायला सांगितलं... शेवटी अर्ध्या तासाने ओंकारला बरं वाटलं आणि तो जिद्दीने पुन्हा तयार झाला. आम्ही जोरात घोषणा देउन पुन्हा चढायला सुरुवात केली. मध्ये मध्ये थांबत, विश्रांती घेत, आणि फोटोसेशन करत आम्ही आता बऱ्यापैकी वेग घेतला होता.  चढाई कठीण नसली तरी थकवणारी नक्कीच होती... मध्येच एके ठिकाणी गरमागरम भजीचा आस्वाद घेऊन आम्ही पुढे निघालो. काही ठिकाणी लोखंडी शिड्या होत्या पण पावसामुळे त्या निसरड्या झाल्या होत्या. जरा पाय चुकला तर कपाळमोक्षच... त्यामुळे जरा जपूनच आम्ही चढत होतो पण त्याही परिस्थितीत फोटोग्राफी, विडीयो शुटींग मात्र अव्याहतपणे चालू होतं. अखेर शेवटची आणि ढगांत अदृश्य झालेली शिडी चढून आम्ही दुपारी ०१.४५ च्या सुमारास कळसुबाईच्या शिखरावर पोचलो... तिथलं दृश्य स्वर्गीय आनंद देणारं होतं... वेड्यासारखा वाहणारा वारा आसमंतात एक वेगळंच संगीत भरत होता... ढग पायांशी सलगी करत होते... एरव्ही पाऊस आपल्या घरी येतो... पण आज आम्हीच पावसाच्या घरी आलो होतो... पाऊसही आनंदाने बेभान होऊन त्याच्याच अंगणात खेळत होता... देवळामागच्या दरीतून पाऊस वरती उसळी मारून येत होता... सगळंच अगदी भन्नाट होतं... स्वर्ग म्हणजे तरी दुसरं काय असतं... निसर्गाच्या बाहुपाशातच खरा स्वर्ग असतो...
आम्ही देवीचं दर्शन घेतलं आणि फोटोसेशन चालू केलं. वाकडातिकडा पडणाऱ्या पावसात कॅमेरा सांभाळणं हे एक मोठं दिव्यच होतं पण तरीही आम्ही स्वत: भिजत आणि कॅमेऱ्यालाहि भिजवत फोटो काढून घेतले... सर्वांनी टाळ्या वाजवून ओंकारचं कौतुक केलं.. पठ्ठ्याने मोठी जिद्द दाखवली होती... नितीन एक छानदार पोवाडा गायला... थोडा वेळ तिथेच थांबून आम्ही परतीच्या वाटेला लागलो... आता तर शिडीचं खालचं टोक दिसतच नव्हतं... ढगांनी शिडीला पूर्णपणे लपवून ठेवलं होतं... त्यामुळे अगदी सावधपणे आम्ही खाली उतरायला सरुवात केली... इथेही जरा पाय चुकला तर कपाळमोक्षच होता... पण नितीनने तरीही एका हाताने विडीयो शूटिंग केलंच... खाली उतरल्यावर आम्ही कमालीचा वेग घेतला... एके ठिकाणी गरमागरम चहाचा आस्वाद घेऊन आम्ही परतीला लागलो... आत्तापर्यंत ह्या चढाईने सुमीतच्या शूजचा बळी घेतला होता... एका पायातल्या शूज चा सोल पूर्णपणे निखळला होता... शेवटी सुमीत एका पायात शूज आणि एक पाय अनवाणी असा खाली उतरला... अशा अवस्थेत निसरड्या वाटेवरून तो कसा खाली उतरला हे त्याचं त्यालाच ठावूक... अखेर खाली उतरल्यावर ओढ्याजवळ सुमीतने दुसऱ्या शूचंही विसर्जन केलं... संध्याकाळी ०५.०० – ०५.१५ च्या सुमारास आम्ही गावात पोचलो.. तिथे जेवण करून मग परतीचा मार्ग धरला...
जाता जाता मागे वळून एकदा कळसुबाईला पाहून घेतलं... सकाळी हात पसरून ‘आव्हान’ देणारा तो भव्य पहाड आता परत भेट देण्याचं ‘आवाहन’ करत असल्याचा उगाचच भास झाला... अचानक उद्भवलेल्या छोट्या मोठ्या संकटांवर मात करून अखेर आम्ही महाराष्ट्रातलं सर्वोच्च शिखर सर केलं... मनाला एक वेगळंच समाधान मिळत होतं...
आत्तापर्यंतच्या अविस्मरणीय मोहिमांमध्ये कळसुबाईचं स्थान पक्कं झालं... आता तयारी पुढच्या ट्रेकची... तोपर्यंत... जय शिवराय....!!!!


-#नवज्योत